ठाण्यात वृद्धेचा विनयभंग करणाऱ्या वृद्धास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:55 PM2019-02-05T22:55:05+5:302019-02-05T23:01:08+5:30
ठाण्याच्या खोपट भागात एका ६० वर्षीय महिलेचा विनयभंग करणा-या ६१ वर्षीय वृद्धाला एका रिक्षा चालकाच्या मदतीने पिडीत महिलेने नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.
ठाणे: एका ६० वर्षीय वृद्धेचा विनयभंग करणा-या प्रकाश म्हात्रे (६१, रा. गोल्डन हेवन, खोपट, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित महिला खोपट परिसरामध्ये घरकाम करते. ती ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोर्टनाका परिसरातून पायी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने संतापलेल्या या महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्या हाताला झटका देत त्याने तिथून पळ काढला. एका रिक्षा चालकाच्या मदतीने आरोपीचा पाठलाग करून या महिलेने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने यापूर्वीही तिचा विनयभंग केला होता, असा तिचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने म्हात्रे याला सोमवारी सायंकाळी अटक केली.