एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या नायजेरियनसह दोघांना मुंब्य्रातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:24 PM2020-01-13T22:24:48+5:302020-01-13T22:31:03+5:30
मुंब्रा येथील चुहा ब्रिजजवळ क्रि स्टल मेफेड्रॉन अर्थात एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणाºया रोहित रवींद्र सावंत आणि त्याचा नायजेरियन साथीदार पॅट्रिक अगांचू या दोघांना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १० ग्रॅम क्रि स्टल एमडी पावडरही जप्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंब्रा येथील चुहा ब्रिजजवळ क्रि स्टल मेफेड्रॉन अर्थात एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणा-या रोहित रवींद्र सावंत (२६, रा. दिवा पूर्व, ठाणे) आणि त्याचा नायजेरियन साथीदार पॅट्रिक अगांचू (३६, रा. नालासोपारा) अशा दोघांना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १० ग्रॅम क्रि स्टल एमडी पावडरही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळील चुहा ब्रिज परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय किरपण, योगेश पाटील, छोटू दाभाडे आणि सुदीप हुलवान यांच्या पथकाने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एमडी पावडरसह रोहित सावंत याला अटक केली. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीची एमडी पावडर आणि एक हजार २५० रुपये इतकी रोकड असा २९ हजार २५० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने ज्याच्याकडून ही एमडी पावडर खरेदी केली, त्या नायजेरियन पॅट्रिक या तस्करालाही १२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास या पथकाने अटक केली. या दोघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८-क, २२-ब आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.