बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:30+5:302021-03-07T04:37:30+5:30
लुटीचा सर्व मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : १ मार्च रोजी भाईंदर पूर्वेस बंदुकीचा धाक दाखवून साडेसतरा ...
लुटीचा सर्व मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : १ मार्च रोजी भाईंदर पूर्वेस बंदुकीचा धाक दाखवून साडेसतरा लाखांना सराफास लुटणाऱ्या दरोडेखोरास नवघर पोलिसांनी शनिवारी नालासोपारा येथून अटक केली. लुटीचा सर्व ऐवज जप्त केला असून आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा आहे.
नवघर मार्गावर कामधेनू इमारतीत एक सराफा दुकान आहे. सोमवारी, १ मार्च रोजी खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या इसमाने स्वतःकडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी देऊन दुकानातील एक लाख ७० हजार रोख, एक मोबाइल व ४५० ग्रॅम वजनाच्या कच्चा सोन्याच्या आठ लगडी असा एकूण १७ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती.
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे व भास्कर पुल्ली, उपनिरीक्षक संदीप ओहाळ, भालेराव वाघ, गिरगावकर, शिंदे, जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना तपासकामी खूपच महत्त्वाचे ठरले. आरोपीने ५ ते ६ रिक्षा बदलल्याचे आढळून आले. रिक्षाचालकांकडून आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला नालासोपारा येथून अटक केली.
अंतरज असे आरोपीचे नाव असून तो पूर्वी भाईंदरच्या जेसलपार्क भागात चांदीच्या अंगठ्याचे काम करत असे. त्यामुळे ५ महिन्यांपूर्वी तो या दुकानात चांदी खरेदी करायला गेला असता त्याला तेथे सोन्याचे दागिनेसुद्धा असल्याचे समजले. त्यानुसार त्याने दरोड्याचा कट आखला.
मोबाइल नाही तर नकली बंदूक वापरली
आरोपीने गुन्ह्यात वापरलेली बंदूक नकली असल्याचे समोर आले आहे, तर गुन्हा करताना त्याने स्वतःजवळ मोबाइल ठेवला नाही. कारण गुन्हे मालिका पाहून त्यात मोबाइल लोकेशनवरून पोलीस आरोपींना पकडत असल्याचे त्याला माहिती होते.