ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:32 PM2019-12-17T22:32:12+5:302019-12-17T22:36:05+5:30
औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणाºया त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या कमिशनवर काम करणाºया नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाड्यातील विष्णुनगर येथील संग्राम एंटरप्रायजेस या औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणा-या त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्याला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विष्णुनगर भागात सौमित्र जोशी यांचे ‘अपोलो’ इमारतीमध्ये हे औषधांचे दुकान आहे. याठिकाणी ३० ते ४० कामगार आहेत. अलिकडेच त्याठिकाणी नोकरीसाठी आलेल्या दीपकला जोशी यांनी कमिशन तत्वावर नियुक्त केले होते. दिवा आणि मुरबाड परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये औषधांची बुकिंग करून त्यांना औषधपुरवठा करण्याचे काम त्याच्याकडे सोपविले होते. प्रत्येक महिन्याला बिलावर त्याला दोन टक्के कमिशन देण्यात येणार होते. सुरुवातीला दोन ते तीन दिवस त्याने चांगल्या प्रकारे काम केले. त्यानंतर ५ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१९ या काळात पुरविलेल्या औषधांच्या बिलांची दोन लाखांची वसुली जोशी यांच्याकडे जमा न करता परस्पर स्वत:कडेच ठेवली. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित मेडिकल दुकानांमध्येही जोशी यांनी विचारणा केली. तेंव्हा दीपक याच्याकडे या रकमा जमा केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दीपक याला त्यांनी संपर्क साधला असता, तो पसार झाला होता. अखेर याप्रकरणी जोशी यांनी त्याच्याविरुद्ध १३ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने १७ डिसेंबर रोजी त्याला उल्हासनगर येथून अटक केली. त्याच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.