खूनाचा प्रयत्न करून मुंबईतून पसार आरोपीस ठाण्याच्या डायघर येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 01:19 AM2020-11-11T01:19:04+5:302020-11-11T01:21:48+5:30
खूनाच्या प्रयत्नासह १६ गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद, दोन वेळा तडीपार तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाई करुनही मुंबईतून पसार झालेल्या गुंडाला डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उसनवारीने घेतलेले पैसे मागितल्याने सलीम शाहू (३०) याच्यावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या अब्दूल शेख (३५, रा. गोवंडी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी डायघर भागातून ताब्यात घेतले. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे नोंद असून त्याला दोन वेळा मुंबईतून तडीपार करण्यात आले होते.
मुंबईतील गोवंडी येथे सलीम आणि अब्दूल यांच्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद झाला होता. यातूनच उसनवारीने घेतलेले पैसे सलीमने मागितल्यामुळे त्याच्यावर मार्च २०२० मध्ये शेख याने तलवाीने वार करुन तो पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अब्दुल शेख उर्फ शंभो हा शीळ डायघर भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १० नोव्हेंबर रोजी त्याला सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी आणि घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रशांत पवार, भूषण शिंदे जमादार शरद तावडे, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, राजेश क्षत्रिय आणि शिवाजी रायसिंग आदींच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. नंतर त्याला देवनार पोलिसांनी अटक केली.
* अब्दूल शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न आणि हाणामारीसह १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे मुंबई तसेच नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याला दोन वेळा मुंबईतून तडीपारही केले होते. तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्टÑ झोपडपट्टी दादा (एमपीडीए) अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे.