मुंबईतील तडीपार गुंडाला ठाण्यातून अटक: व्यावसायिकाची करणार होता हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:01 AM2018-03-04T00:01:54+5:302018-03-04T00:01:54+5:30
पूर्ववैमनस्याचा वचपा काढण्यासाठी व्यापा-याच्या हत्येसाठी पिस्टल घेऊन आलेल्या तडीपार गुंडाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकने अटक केली. त्याने २५ हजारांमध्ये उत्तरप्रदेशातून हे पिस्टल आणले होते.
ठाणे: भांडूपमधील एका व्यावसायिकाची हत्या करण्याच्या बेतात असलेल्या संदेश भिरघुनाथ दुबे (२७, प्रतापनगर, भांडूप) या तडीपार गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याला ५ मार्च २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागात एक व्यक्ती एसटी डेपोकडे जाणा-या रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक भागातून निरीक्षक शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश महाजन, संदेश गावंड, विकास बाबर, पोलीस नाईक रुपेश नरे, हेमंत महाले, महेश साबळे आणि नितिन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा रचून दुबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल अग्नीशस्त्र आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खून, खूनाच्या प्रयत्नासह हाणामारीचे आठ ते दहा गुन्हे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याची भांडूप परिसरात दहशत असल्यामुळे त्याला मुंबई आणि ठाणे जिल्हयातून २०१६ पासून तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो मोकाट फिरत होता.
खूनाचा डाव
दुबे आणि भांडूपचा एक व्यावसायिक संजय सिंग याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून सिंग याने दुबेला जबर मारहाण केली होती. दुबेच्या आईने यात मध्यस्थी करुनही तिलाही त्याने धक्काबुक्की करीत दुबेला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली होती. याच रागातून दुबे याने उत्तरप्रदेशातील जौनपूर येथून २५ हजारांमध्ये एक पिस्टल आणि काडतुसे आणली होती. या पिस्टलने तो सिंगची हत्या करण्याच्या बेतात होता. तत्पूर्वीच तो ठाणे पोलिसांच्या जाळयात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.