ठाण्याच्या महापौरांना गँगस्टर दाऊदच्या नावाने धमकी देणा-याची मुंब्य्रातून धरपकड
By जितेंद्र कालेकर | Published: September 19, 2019 10:57 PM2019-09-19T22:57:28+5:302019-09-19T23:27:32+5:30
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देणा-या दाऊदच्या कथित हस्तकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. त्याने ही धमकी नेमकी का दिली? त्याचा दाऊदचा नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे: ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर तसेच छोटा शकीलच्या नावाने उचलून नेण्याची धमकी देणा-या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. तो दाऊदचा हस्तक आहे की नाही, याची मात्र खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुम्ही नीट राहिले नाही तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटूंबियांना त्रास देऊ, तुम्ही हिशोबात रहायचे’ असे आव्हान देतच एका अनोळखी व्यक्तीने १७ सप्टेंबर रोजी रात्री ११.१६ ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान महापौर शिंदे यांना धमकी दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने या फोनचा मागोवा घेतला असता, तो मुंब्रा येथील एका महिलेच्या नावावर असल्याची बाब समोर आली. तिला चौकशीसाठी बोलविण्यात आले असता, हा फोन क्रमांक आपला असला तरी या धमकीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने स्पष्ट केले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वासिम मुल्ला याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. धमकी देणारा हा खरोखर दाऊदचा हस्तक आहे की, तोतया हस्तकाने हा खोडसाळपणा केला, याबाबतही आता सखोल चौकशी करण्यात येत आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनीही दुजोरा दिला असून अधिक तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थेट महापौरांना असा धमकीचा फोन आल्याने पालिका वर्तुळातही दाऊद किंवा छोटा शकील यांच्या नावाने महापौरांना कोण धमकी देऊ शकते? असे तर्कवितर्क केले जात होते.
खंडणी विरोधी पथकाचा दबदबा कायम
पोलीस खात्याचा राजीनामा देऊन राजकारणात गेलेले प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख होते. त्यांनीच ठाण्यात पदभार घेतल्यानंतर दाऊदचा भाउ इकबाल कासकर याला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईतून अटक केली होती. याशिवाय, त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्हयांचा आपल्या अधिपत्याखालील अधिका-यांकडून मोठया कौशल्याने तपास केला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही क्लिष्ट गुन्हयांचा अल्पावधीत छडा लावण्याची हीच परंपरा त्यांच्या अधिपत्याखालील खंडणी विरोधी पथकाने कायम ठेवल्याचे महापौर धमकी प्रकरणाने अधोरेखित झाले आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर या पथकाची ही मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.