शस्त्राच्या तस्करीसाठी आलेल्या आरोपीला ठाण्यातून अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: December 26, 2023 10:03 PM2023-12-26T22:03:00+5:302023-12-26T22:04:43+5:30
तीन गावठी रिव्हॉल्व्हर, दोन काडतुसे हस्तगत
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्राणघातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या रितेश रामप्रवेश सिंग (३६, रा. गांधीनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून गावठी बनावटीची तीन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
कळव्यातील खारेगाव भागात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २५ डिसेंबरला दुपारी ३:४५ वाजता पोलिस उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने सोमवारी दुपारी मुंबई-नाशिक मार्गावर खारेगांवकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर सापळा रचून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रितेश याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.