तब्बल दीड महिन्यांनी शरण आला बनावट कागदपत्रांवर आधार ओळखपत्र बनवणारा आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 10:59 PM2018-02-01T22:59:58+5:302018-02-01T23:00:09+5:30
शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे.
मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे. त्याला ठाणे न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. भार्इंदरच्या आंबेडकर मार्गावरील महावीर अपामध्ये राहणारा नरेश जयंतीलाल मेहता याने मेहता असोसिएट्स या नावाने आधार व पॅनकार्ड आदी बनवून देण्याचे कार्यालय थाटले होते. शासनाने देखील केंद्रास मान्यता दिली होती.
आॅक्टोबर २०१७ मध्ये सदर केंद्रातून अवघ्या दोन हजार रुपयात कागदपत्रं नसली तरी आधार, पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील पोलिसांनी कार्यवाही केली नाही. अखेर वरिष्ठांकडे तक्रारदारांनी दाद मागितल्यानंतर १२ डिसेंबर रोजी पोलिसांनी मेहता विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पण मेहता मात्र सहज पसार झाला होता.
त्या आधी पोलिसांनी मेहताच्या कार्यालयातून आयकर विभागाच्या आवक जावकचा रबरी शिक्का, भाजपा नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांचे ३ कोरे शिक्के असलेले लेटरपॅड, काँग्रेसचे पालिका निवडणुकीतील उमेदवार साहेबलाल यादव व मुकेश रावल यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, ठाणेचे शासकीय शिक्के, पोद्दार शाळेचे शाळा सोडल्याचे १५ कोरे दाखले, शिधावाटप पत्रिका व कोरी पानं, विविध जन्म दाखले, लग्न नोंदणी दाखला आदी ताब्यात घेतले होते.
गुन्हा दाखल झाल्यावर ८ संगणक पोलिसांनी जप्त केले होते. तर या प्रकरणी पसार झालेल्या आरोपी मेहताने ठाणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने देखील त्याला गेल्या महिन्यातच हजर होण्यास सांगितले होते. उशिराने का होईना मेहता हा आज वकिलासह भार्इंदर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करुन ठाणे न्यायालयात नेले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुख्य आरोपी अटक झाल्याने त्याच्या चौकशी नंतर अधिक माहिती समोर येईल अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. तर आधीपासूनच पोलिसांनी या गंभीर प्रकरणी वेळीच दखल घेतली नसल्याने चौकशीबद्दल देखील साशंकता असल्याचे मनसेचे भार्इंदर सचीव प्रमोद देठे यांनी सांगितले.