उल्हासनगरात गांजाची तस्करी करणाऱ्या पुजारी टोळीच्या तस्कराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:45 PM2019-03-14T22:45:56+5:302019-03-14T22:53:08+5:30
मुंबईत खंडणीचे चार गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टर पुजारी टोळीतील रोहिदास घाडगे याला गांजाची तस्करी करतांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे.
ठाणे : उल्हासनगर-विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या रोहिदास घाडगे (४६, चिंचपाडा, कल्याण, पूर्व) या रवी पुजारी टोळीच्या तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५५ हजारांचा साडेआठ किलोचा गांजा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांचे पथक कल्याणच्या चिंचपाडा परिसरात गस्त घालत असताना त्याच परिसरात रोहिदास हा गांजा विक्री करत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने १३ मार्च रोजी सापळा रचून त्याला अटक केली. कल्याण, उल्हासनगर परिसरात विक्रीसाठी आणलेला साडेआठ किलो वजनाचा गांजाही त्याच्याकडून या पथकाने हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
* घाडगेविरुद्ध खंडणीचेही गुन्हे
रोहिदास घाडगे हा गँगस्टर रवी पुजारी टोळीशी संबंधित असून त्याच्याविरुद्ध मुंबईत यापूर्वी खंडणीचेही चार गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्कांतर्गतही कारवाई केली होती. यात तो पाच वर्षे कारागृहात होता. अलीकडेच तो कारागृहातून सुटला होता. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्याची खबर ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर, त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.