एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी अहमदनगर येथून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:57 PM2021-01-21T21:57:46+5:302021-01-21T22:01:46+5:30
मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणाऱ्या सागर मगर (२५, रा. दिवा, ठाणे) याला अहमदनगर येथून अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. त्याला गुरुवारी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता. दरम्यान, यातील आरोपी सागर मगर यानेच या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असून तो अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे वास्तव्याला असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, पोलीस नाईक अमोल देसाई, माधुरी जाधव आणि राहूल पवार आदींच्या पथकाने २० जानेवारी रोजी अहमदनगर येथे जाऊन सर्व बाबींची पडताळणी केली. अथक परिश्रमांअंती सागर हा शेवगाव येथील कुणाल हॉटेल येथे असल्याची माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे शेवगाव पोलिसांच्या मदतीने कुणाल हॉटेल येथे छापा मारुन या अल्पवयीन मुलीची सुटका करुन सागर याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याला आता मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.