पत्नीशी झालेल्या भांडणातून विनयभंगातील आरोपीची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Published: December 4, 2018 10:45 PM2018-12-04T22:45:15+5:302018-12-04T22:52:46+5:30
ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा ...
ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (३८, रा. लोढा अमारा, कोलशेत, ठाणे) याने २५ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे पोलिसांनी सुपूर्द केला.
विवाहित असलेल्या अभिशेषकुमारचे आपल्याच कार्यालयातील सहकारी महिलेशी मैत्रीचे संबंध होते. त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आणि ‘अपेक्षे’मुळे या महिलेने त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिने पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्याशी मैत्रिचे संबंध ठेवावेत, यासाठी त्याचा आग्रह होता. त्यासाठी तो तिला वेगवेगळया मोबाइलवरून फोन करीत होता. तिच्या मेल आयडी आणि व्हॉटसअॅपवर मेसेज करुन तिच्यासह तिचे पती, आई, सासू, सासरे, नणंद आदींना त्याने शिवीगाळही केली. तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटूंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी त्याला अटकही झाली होती. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एककडे सोपविण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सोमवारी ३ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याची सायंकाळी ५ वा. च्या सुमारास जामीनावर सुटका केली. त्याला अटक झाली त्यावेळी (२८ नोव्हेंबर रोजी) त्याची पत्नी पोर्णिमा (३०) हिला त्याचे बाहेरील हे प्रकरण समजले. त्यामुळे ती संतापलेली होती. सोमवारी सायंकाळी तो जामीनावर सुटल्यानंतर मात्र तिने या प्रकाराचा जाब विचारुन त्याला फैलावर घेतले. त्याच्या आईवडिलांसमोरच तिने चांगलाच पानउतारा करून त्याच्याशी कडाक्याचे भांडण केले. तिचा संयम सुटल्यानंतर तिने यातूनच त्याला मारहाणही केली. आधी पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीने केलेल्या विनयभंगाच्या गुन्हयात झालेली अटक त्यानंतर पत्नीने आईवडिलांसमोरच जाब विचारत केलेले भांडण यातून व्यथित होऊन आपल्याच लोढा- अमारा या इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून अभिशेषकुमारने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कंपनीतून कारवाईचीही होती भीती
रिलायन्ससारख्या बडया कंपनीत मोठया पदावर नोकरीवर असल्याने विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कंपनीतूनही कारवाईची टांगती तलवार अभिशेषकुमारवर होती. याच दडपणाखाली तो असतांना सोमवारी पती पत्नींमधील वादाचीही त्यात भर पडली. यातून पूर्णपणे कोसळल्यामुळे त्याने घरातून बाहेर येत घराच्या समोरील लॉबीच्या खिडकीतून स्वत:ला झोकून दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.