संचित रजेवर सुटल्यानंतर कारागृहातून पसार आरोपी उत्तरप्रदेशातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 10:33 PM2018-12-07T22:33:29+5:302018-12-07T22:45:08+5:30
ठाण्यातील एका खून प्रकरणामध्ये २१ वर्षांंपूर्वी अटक झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा झालेला अशोककुमार सिंग हा संचित रजेवर नाशिक कारागृहातून बाहेर आला होता. तो गेल्या १८ वर्षांपासून फरार होता.
ठाणे : एका खून प्रकरणामध्ये १९९७ मध्ये (२१ वर्षांपूर्वी) जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर सुटल्यानंतर पसार झालेल्या अशोककुमार सिंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने गुरुवारी उत्तरप्रदेशातून अटक केली. सुलतानपूर या त्याच्या मूळ गावातून पोलिसांनी त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
ठाण्याच्या करवालोनगर येथे ५ डिसेंबर १९९४ मध्ये डेनिस कम्पाउंडमधील रामनारायण सिंग यांच्याशी झालेल्या स्थावर मालमत्तेच्या वादातून प्रयागसिंग सिंग, वेदप्रकाश सिंग आणि अशोककुमार सिंग यांनी आपसात संगनमत करून धारधार शस्त्राने रामनारायण यांचा खून केला होता. याच गुन्ह्यात यातील तिन्ही आरोपींना १९९७ मध्ये ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजारांचा दंडाची तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा लागलेला अशोककुमार हा (बंदी क्र. सी/२९८४) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर बाहेर आला होता. तो २६ फेब्रुवारी २००० मध्ये कारागृहात पुन्हा हजर होणे अपेक्षित होते. मात्र, हजर होण्याऐवजी तो पसार झाला होता. त्याचा नाशिक, ठाणे आणि मुंबई पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही शोध घेण्यात येत होता. गेल्या १८ वर्षांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तो पसार झाल्याचा गुन्हाही ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तो त्याच्या उत्तरप्रदेशातील सुलतानपूर या मूळगावी असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. बी. सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुभाष मोरे, एस. पी. गायकवाड या पथकाने उत्तरप्रदेशातील टास्क फोर्स, लखनौ आणि स्थानिक देहात कोतवाली, सुलतानपूर या पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याला ६ डिसेंबर २०१८ रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतांना स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी करून त्याच्या अटकेला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता ठाणे पोलिसांनी कौशल्याने त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............