खून प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 10:13 PM2020-12-02T22:13:28+5:302020-12-02T22:20:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) याचा खून करणाऱ्या हेमंत मोरघा या आरोपीला दहा वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी बुधवारी सुनावली आहे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन वर्षापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जव्हारमधील उंबरखेडा गावातील रहिवाशी हेमंत हा २९ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावातील जयराम कव्हा यांच्या घरासमोरील अंगणात उभा होता. त्यावेळी तो कोयत्याने स्वत:ची जीभ कापण्याचा प्रयत्न करीत होता. तेंव्हा जयराम यांनी जीभ का कापतो, वेड्यासारखा का करतो? असे त्याच्याजवळ जाऊन त्याला सुनावले. याचाच राग हेमंतला आला. त्याने या रागाच्या भरात कोयत्याने जयराम यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन जव्हार पोलिसांनी हेमंतला अटकही केली. पोलिसांनी कलम ३०२ अन्वये हेमंतविरु द्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. परंतू, आरोपीचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे न्यायाधीश जोशी यांनी कलम ३०४ भाग एक या कलमाखाली त्याला दोषी ठरवून दहा वर्ष कारावास आणि दोन हजार रु पये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे उज्वला मोहोळकर यांनी तर तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक घनशाम आढाव यांनी काम पाहिले.