क्षुल्लक कारणावरुन खून करुन पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 10:24 PM2020-10-30T22:24:27+5:302020-10-30T22:30:20+5:30
सुपारी घेऊन केलेल्या खूनाचे पैसे न मिळाल्यामुळे मित्रांनीच डिवचले. त्यामुळे रुपेश पवार (३४) याचाही खून करुन पसार झालेल्या अभिजित जाधव (२९) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने शुक्रवारी अंबरनाथ येथून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: पाच वर्षांपूर्वी सुपारी घेऊन केलेल्या खूनामध्ये पैसे न मिळाल्यामुळे यातून मित्रांनीच डिवचल्यामुळे रुपेश जनार्दन पवार (३४, रा. बदलापूर, पश्चिम) याचाही खून करुन पसार झालेल्या अभिजित जाधव (२९, रा. बदलापूर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने शुक्रवारी अंबरनाथ येथून अटक केली आहे. त्याला बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अभिजित याने २०१५ मध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा सुपारी घेऊन खून केला होता. सुपारी घेऊनही या खूनाचे त्याला काहीच पैसे मिळाले नव्हते. यावरुनच रुपेश पवार आणि त्याच्या मित्रांनी अभिजितला चिडवून डिवचले होते. याचाच राग आल्याने अभिजितने १२ आॅगस्ट २०२० रोजी रुपेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचा खून केला होता. या खूनानंतर मात्र तो पसार झाला होता. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपूरी पोलीस ठाण्यातही २०१३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, बदलापूर आणि कोल्हापूरात त्याच्याविरुद्ध खून, खंडणी, शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बदलापूर पूर्व या पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या शाखाप्रमुखाच्या गुन्हयातही त्याला जामीन मिळाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ अंतर्गत या खून प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता. अभिजित हा गुजरातच्या वापी येथे असल्याची माहिती पोलीस नाईक दादा पाटील यांना मिळाली. त्याच अनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार आनंदा भिलारे, दादा पाटील आणि चंद्रकांत वाळूंज आदींनी गुजरातच्या वापी आणि शहरात २७ आॅक्टोबर रोजी शोध घेतला. मात्र, तिथून तो कोल्हापूर येथे मुळ गावी सटकला. मोबाइलही न वापरता तो कोल्हापूरातूनही अंबरनाथ येथे निसटला. अखेर ३० आॅक्टोबर रोजी अंबरनाथ एमआयडीसी भागातून युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.