पैशाच्या वादातून मालकाचाच खून करुन पसार झालेल्या आरोपीस १९ वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:13 AM2020-11-21T01:13:57+5:302020-11-21T01:19:58+5:30
पैशाच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३,रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करुन पसार झालेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तब्बल १९ वर्षांनी गुरुवारी अटक केली. या खूनाच्या यशस्वी तपासाबद्दल युनिट एकच्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पैशाच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३,रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करुन पसार झालेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला रामनगर (डोंबिवली) पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांच्याशी त्यांचा देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरुन भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे राजाराम याने रेगो यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन त्याचा खून करुन ८ मे २००१ रोजी पलायन केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी राजाराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तो कर्नाटक राज्यातील कुद्र ( जिल्हा-उडपी ) येथील रहिवाशी असल्यामुळे गावी तसेच महाराष्टÑातील नाशिकसह वेगवेगळया जिल्हयांमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळेच तो पोलिसांना मिळत नव्हता. यातील आरोपीला शोधण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. दरम्यान, तो ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार भिलारे, सुनिल जाधव, पोलीस नाईक रिजवान सय्यद, नीलम पाचपुते आणि राहुल पवार आदींच्या पथकाने १९ नाव्हेंबर २०२० रोजी विटावा येथे रेल्वे ब्रीजजवळ सापळा रचून राजाराम याला ताब्यात घेतले. या तपासासाठी मोहन भानुशाली यांचे तपास पथकाला विशेष सहकार्य मिळाले. गेली १९ वर्षे पसार झालेल्या राजाराम याच्याविरुद्ध सीआरपीसी २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
* तब्बल १९ वर्षे पाठपुरावा करुन आरोपीला अखेर मोठया कौशल्याने अटक केल्याने युनिट एकच्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.