विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस दोन वर्षांनी अटक, ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 12:44 AM2022-06-17T00:44:41+5:302022-06-17T00:45:09+5:30
मुंब्रा येथील २४ वर्षीय विवाहितेशी रफीकची ओळख झाली होती. तिच्या नात्यातील एक मुलगी लग्नासाठी पाहण्याच्या बहाण्याने तो तिच्याकडे आला होता.
ठाणे: मुंब्रा येथील ओळखीतल्याच एका २४ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या रफीक खान (३०, रा. नालासोपारा पूर्व, पालघर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने पालघर येथून बुधवारी अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून तो ठाणे पोलिसांना हुलकावणी देत होता.
मुंब्रा येथील २४ वर्षीय विवाहितेशी रफीकची ओळख झाली होती. तिच्या नात्यातील एक मुलगी लग्नासाठी पाहण्याच्या बहाण्याने तो तिच्याकडे आला होता. २०१७ ते २०२० या काळात त्यांच्यात मैत्री झाली. याच दरम्यान त्याने तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ मोबाइलमध्ये काढल्याचे सांगत तो तिला ब्लॅकमेल करत होता. शिवाय, या प्रकाराची वाच्यता केल्यास मोबाइलमधील क्लिप पती आणि नातेवाइकांना दाखविण्याची धमकीही तो देत होता. हीच धमकी देत तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. एवढेच नाही, तर तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाणही केली होती.
या सर्वच प्रकाराला कंटाळून अखेर तिने मुंब्रा पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२० मध्ये बलात्कार, शिवीगाळ, धमकी देणे आणि मारहाणीची तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांप्रमाणेच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून रफीक हा आपल्या राहण्याचे ठिकाण तसेच मोबाइल क्रमांक बदलून सुमारे दोन वर्षांपासून फरार होता. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने आरोपी पूर्वी वापरत असलेल्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा शोध घेतला.
अखेर, तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे असल्याची माहिती या पथकाला मिळाली. याचआधारे त्याला १५ जून २०२२ रोजी जुचंद्र, नायगाव (जि. पालघर) येथून अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीसाठी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.