मारहाणीच्या गुन्ह्यात सात वर्षे फरार आरोपीला बेड्या; जुगार अड्ड्यावरही छापा, ठाणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: April 16, 2024 08:35 PM2024-04-16T20:35:59+5:302024-04-16T20:36:07+5:30
एलसीबीच्या वाशिंद युनिटच्या पकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहापूर पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या एका हाणामारीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
ठाणे : हाणामारीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोकावडे गावाजवळील सावरणे गावाबाहेरील जुगार अड्ड्यावर छापा घातल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी मंगळवारी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील वेगवेगळ्या पाहिजे, तसेच फरारी आरोपींवर कारवाईचे, तसेच बेकायदा व्यवसायांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी अलीकडेच दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईसाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. एलसीबीच्या वाशिंद युनिटच्या पकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहापूर पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या एका हाणामारीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, वाशिंद युनिटच्या पकाने १० एप्रिल रोजी गोपनीय माहितीच्या आधारे टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरणे गावाच्या बाहेर रोडजवळ सुरू असलेल्या पाकोळी जुगारावर छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई उपनिरीक्षक महेश कदम, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रवीण हाबळे, संतोष कोळी आणि हेमंत विभुते आदींच्या पथकाने केली.