अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० सश्रम कारावासाची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2024 10:38 PM2024-09-02T22:38:47+5:302024-09-02T22:39:34+5:30
कळव्यातून अपहरण करुन पनवेलमध्ये अत्याचार
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सध्या बदलापूर आणि अंबरनाथमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आले असतांनाच तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका १३ वर्षीय मुलीवरील बलात्कारातील आरोपी संतोष पुंडलिक गवलवाड (३०, रा. विटावा, ठाणे) याला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही आरोपीला सुनावण्यात आली आहे.
कळव्यातील विटावा भागात राहणाऱ्या संतोष याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेली होती. त्यावेळी त्याची एक नातेवाईक असलेली ही १३ वर्षीय पिडित मुलगी घरात मदतीसाठी त्याच्याकडे आली होती. याचाच गैरफायदा घेत त्याने तिला सुरुवातीला बिर्याणी खाऊ घालण्याचे अमिष दाखविले. नंतर बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करीत पनवेल येथील घरी डांबून ठेवले. हा प्रकार ११ ऑक्टाेबर २०२१ ते १३ ऑक्टाेबर २०२१ या काळात घडला. याच दरम्यान त्याने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी १२ ऑक्टाेबर सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश दिनकर यांच्या पथकाने आराेपीला अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पोक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात २ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आठ साक्षीदार तपासून आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. विशेष म्हणजे तक्रारदार यात फितूर होऊनही पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने यातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.