गांजाची तस्करी करणाऱ्या ‘त्या’ आरोपीची तळोजा कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:50 PM2020-09-10T23:50:38+5:302020-09-10T23:53:38+5:30
गांजाची तस्करी करणा-या राजू मोहम्मद शेख (५०, रा. शिवडी, मुंबई) याची पोलीस कोठडी संपल्यामुळे गुरुवारी त्याची ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गांजाची तस्करी करणा-या राजू मोहम्मद शेख (५०, रा. शिवडी, मुंबई) याची गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने त्याला साडे चार किलोच्या गांजासह अटक केली होती.
मुंब्रा बाय पास रोडवरील लाल किल्ला ढाब्याच्यासमोर सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कु-हाडे आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांच्या पथकाने ६ सप्टेंबर रोजी ५.२५ वाजण्याच्या सुमारास शेखला गांजा तस्करीप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून चार किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्याला ७ सप्टेंबर रोजी पहाटे अटक केली होती. त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होती. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्यानंतर त्याची रवानगी नवी मुंंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.