खूनी हल्ल्यासाठी पिस्टल पुरविणाऱ्या आरोपीला सात पिस्टलसह ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 08:17 PM2021-02-15T20:17:07+5:302021-02-15T20:20:41+5:30
उल्हासनगर परिसरातील एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयात वॉन्टेड असलेल्या कैलाससिंग चावला (२७, रा. गांधवानी, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. सखोल चौकशीमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एक वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयातील आरोपीला त्याने पिस्टल पुरविल्याचे उघड झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उल्हासनगर परिसरातील एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयात वॉन्टेड असलेल्या कैलाससिंग चावला (२७, रा. गांधवानी, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्याकडून सात माऊजर पिस्टल, दोन मॅगझीन आणि २० जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
ठाण्यातील साकेत येथील महालक्ष्मी मंदिराच्याजवळ कैलाससिंग हा गावठी बनावटीच्या माऊजर पिस्टल तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, संदीप चव्हाण आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पिस्टल विक्रीसाठी आलेल्या कैलाससिंग याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या झडतीमध्ये सात माऊजर पिस्टलसह एक लाख ८८ हजार ७५० रुपयांची शस्त्रसामुग्री हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३७-१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. सखोल चौकशीमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एक वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयातील आरोपीला त्याने पिस्टल पुरविल्याचे उघड झाले. यात तो गेल्या अनेक दिवसांपासून वॉन्टेड होता. त्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.