बलात्कारानंतर पीडितेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला दिला चोप; नौपाडा पोलिसांनी केली अटक

By जितेंद्र कालेकर | Published: February 1, 2024 10:58 PM2024-02-01T22:58:52+5:302024-02-01T23:00:03+5:30

पती आणि मुलाला पाठवले होते अश्लील फोटो

Accused who blackmailed victim after rape beaten | बलात्कारानंतर पीडितेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला दिला चोप; नौपाडा पोलिसांनी केली अटक

बलात्कारानंतर पीडितेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला दिला चोप; नौपाडा पोलिसांनी केली अटक

ठाणे : मैत्रीच्या नावाखाली ठाण्यातील एका ४२ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल व मारहाण करणारा राकेश दामोदर साधवानी (३२, रा. उल्हासनगर) या आरोपीला ठाण्यातील काही नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाली केले. या आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी गुरुवारी दिली.

ठाण्यात राहणारी ही महिला उल्हासनगरमध्ये नोकरीला आहे. तिथेच राकेशबरोबर पीडितेची ओळख झाली. सुरुवातीला त्याने तिच्याबरोबर मैत्रीचा बहाणा केला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या या अत्याचाराला तिने तीव्र विरोध केल्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो तिचा पती आणि मुलाला पाठविले व तिला मारहाण केली. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.

तिच्या पतीने तिला विश्वासात घेत राकेशविरुद्ध अखेर १ फेब्रुवारी २०२४ रोजी बलात्कार, विनयभंग आणि मारहाण तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतरही राकेश ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात मोकाट फिरत असल्याचे ठाण्यातील काही नागरिकांना दिसले. या नागरिकांसह भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहराध्यक्ष महेश मोरे तसेच इतरांनी त्याला गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांगलाच चोप दिला. त्यानंतर नागरिकांनीच त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Accused who blackmailed victim after rape beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.