जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीला भाईंदरमध्ये पकडले
By धीरज परब | Published: September 6, 2023 08:26 PM2023-09-06T20:26:58+5:302023-09-06T20:27:47+5:30
नवघर पोलिसांनी त्याला जे जे मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .
मीरारोड - मुंबईच्या जे जे रुग्णालयातून उपचारासाठी दाखल असलेला आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळाला असता त्याला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी ४ तासात पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले .
रिक्षा चालवणारा आरोपी विवेक विश्वनाथ तोरडे (२६ ) रा. इंदिरानगर झोपडपटटी, भाईंदर पूर्व ह्याने तो रहात असलेल्या परिसरात मे महिन्यात मध्यरात्री नंतर घरात शिरून एकाचा मोबाईल बळजबरी लुटून नेला होता . तर अन्य चार घरांचे मध्यरात्री नंतर दार उघडे पाहून आतील मोबाईल चोरले होते . नवघर पोलिसांनी दाखल केलेल्या त्या ५ गुन्ह्यात तोरडे ह्याला अटक केल्या नंतर त्याच्या कडून ९ मोबाईल व रोख हस्तगत केली होती . न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्या ने त्याला तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते . मात्र प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने त्याला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . परंतु उपचारा दरम्यान बुधवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास तो नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला .
आरोपी हा भाईंदरचा राहणारा असल्याने जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कलीम शेख यांनी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना आरोपी पळून गेल्या बाबतची माहिती दिली. पवार यांनी त्वरित गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक संदिप पालवे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे सह भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांना तोरडे याचा शोध घेण्यास रवाना केले . त्यांच्या सोबत जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे प्रितेश शिंदे, संदिप भेरे देखील होते . पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला असता नवघर स्मशानभूमी येथून दुपारी २ च्या सुमारास त्याला पकडले .