नायजेरियन व्यक्तीचा खून करुन ४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:50 PM2023-10-17T18:50:32+5:302023-10-17T18:50:40+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कामगिरी
नालासोपारा (मंगेश कराळे) :- नायजेरियन नागरिकाचा खून करून ४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
प्रगती नगरच्या हायटेंशनरोड येथे राहणाऱ्या जोसेफ उर्फ चिन्डीनिजु अमएची विल्सन (३५) याची १६ ऑक्टोबर २०१९ रोजी अंमली पदार्थाच्या नशेवरुन आरोपींनी तिक्ष्ण हत्याराने मारहाण करुन त्याची हत्या केली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात तपासिक अधिकाऱ्यांनी तपास करुन नसीरखान वलीमहोम्मद खान, आशिष उर्फ विक्की रोजेश मिश्रा, अमित अमर सिंह आणि कांचा अशा ४ आरोपींची नावे निष्पन केली. त्यापैकी नसीरखान वलीमहोम्मद खान याला अटक करुन त्याचे विरोधात वसई न्यायालयात दोषारोप सादर केले होते. गुन्हयातील पाहीजे आरोपीत हे सापडुन न आल्याने त्यांना गुन्हयात अटक करता आले नव्हते.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयांतील पाहीजे व फरार निष्पन्न परंतु नजेराआड असणाऱ्या आरोपींचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरीष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे तुळींज पोलीस ठाण्यातील या गुन्हयाचे तपासाबाबत व गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस ठाण्यातुन माहीती प्राप्त करण्यात आली. पाहीजे आरोपीचा शोध घेण्याअनुषंगाने घटनेबाबत गुन्हयाचे घटनास्थळी जावून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त बातमीदाराकरवी माहीती प्राप्त करून पाहीजे आरोपी कांचा याचे पुर्ण नाव रोशन बैचन मंडल उर्फ कांचा असे असल्याचे निष्पन्न करण्यात आले. हा आरोपी गुन्हा घडले प्रकारानंतर ६ महीने बँगलोर, कर्नाटक येथे वास्तव्यास होता व त्यानंतर सध्या तो अश्पाक महोम्मद शेख हे खोटे नाव धारण करुन डॉनलेन परीसरात वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त केली. आरोपीचा कसोशिने आजूबाजुचे परीसरात शोध घेवून त्याची ओळख पटवुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी केल्यावर ४ वर्षापुर्वी घडलेल्या गुन्हामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर यांनी केली आहे.