तक्रारदारच निघाला वाहने जाळणारा आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 10:54 PM2018-12-07T22:54:24+5:302018-12-07T23:08:36+5:30
ठाण्याच्या गणेशवाडीत गुरुवारी पहाटे नऊ वाहनांना आगी लागण्याचा प्रकार घडला होता. यातील एक तक्रारच आरोपी असल्याचे सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे स्पष्ट झाल्यानंतर विजय जोशी आणि त्याचा साथीदार अनिकेत जाधव यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली.
ठाणे : दीड वर्षांपूर्वी चोरीचा आळ घेऊन तक्रार दाखल केल्याच्या रागातून विजय जोशी (२२) याने आणि त्याचा साथीदार अनिकेत जाधव (१९) या दोघांनी गणेशवाडीत वाहनांना आगी लावल्याचे उघड झाले आहे. अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून नौपाडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
ठाण्यातील पूर्व दू्रतगती मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील गणेशवाडीमध्ये गुरुवारी पहाटे २ ते ३ वा. च्या सुमारास नऊ मोटारसायकलींना आगी लागल्याने एकच खळबळ उडाली होती. परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेऊन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि संजय धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांची दोन पथके तयार केली होती. दोन्ही पथकांनी सुमारे ४० ते ५० सीसीटीव्हींच्या फूटेजची पडताळणी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि काही संशयितांकडेही त्यांनी चौकशी केली. याच दरम्यान, एका सीसीटीव्हीत दोन तरु ण संशयास्पदरित्या आढळले. त्यांनी आणलेल्या कारचा लाईट हा वेगह्या प्रकारचा होता. त्या आधारे त्या गाडीचा शोध घेतल्यानंतर आधी अनिकेतला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सीसीटीव्हीतील ती कारही आढळली. त्याच्याच चौकशीतून विजय जोशीचे नाव समोर आले. जुलै २०१६ मध्ये गणेशवाडीतील एकाने विजयविरुद्ध चोरीचा आरोप करून तक्रार नोंदविली होती. या तक्रारदाराला घटनास्थळी त्यावेळी विजयचे पाकिट मिळाल्याने त्याच्याविरुद्ध ही तक्रार झाली होती.या तक्रारीनंतर परिसरातील लोक त्याला ‘चोर चोर’ असे हिणवून त्याची हेटाळणी करीत होते. प्रत्यक्षात चोरीसाठी तिथे शिरलाच नव्हता, असा त्याचा दावा होता. पण आपल्यावर होत असलेल्या हेटाळणीमुळे तो व्यथित झाला होता. याच रागातून त्याने अनिकेतच्या मदतीने या तक्रारदाराची नविन गाडी जाळण्याचे ठरविले. त्याने ती गाडी पेटविली. पण तिच्यासह इतर आठ अशा नऊ गाड्या यात जळाल्या. विशेष म्हणजे ज्याने या गाड्या पेट्रोल टाकून पेटविल्या, त्याचीही गाडी यात जळाली. त्यामुळे गाडी जळालीची तक्रार देण्यासाठी तोही पुढे आला होता. गुरुवारी जो तक्रारदार होता, तोच विजय यात आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याचेही पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल स्वामी यांनी तपासपथकाचे विशेष कौतुक केले........................