मृतांवर दाखल होणार गुन्हा, बुधवारी नातेवाईक येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:53 AM2018-06-20T05:53:58+5:302018-06-20T05:53:58+5:30
दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्स्प्रेसला धडक दिल्याने ठार झालेल्या त्या मयत दुचाकीस्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वेय गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्स्प्रेसला धडक दिल्याने ठार झालेल्या त्या मयत दुचाकीस्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वेय गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा गुन्हा दिवा रेल्वे सुरक्षाबल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणार, याबाबत अद्यापही दोन्ही पोलीस दलात संभ्रमाचे वातावरण आहे. या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दोघांचे नातेवाईक मंगळवारी आले नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी यांची सोमवारी सकाळी ११ वाजता झालेल्या अपघातानंतर ओळख पुढे येण्यास जवळपास सायंकाळ झाली. त्यानंतर, त्या दोघांच्या नातेवाइकांना याबाबत माहिती देण्यात आली, तसेच त्यांचे नातेवाईक ठाण्याला येण्यास निघाले असून, ते बुधवारी येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दोघे एकाच गावातील रहिवासी असून, या व्यतिरिक्त त्यांची अधिक माहिती कळू शकलेली नाही. तर, अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वारावर रेल्वे कायद्यानुसार, गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
>पुढील तपास होणार नाही...
या अपघातानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे, पण रेल्वे फाटक रेल्वे सुरक्षाबल पोलीस ठाण्यात येते. त्यामुळे गुन्हा दाखल करायचा, तर तो दिवा रेल्वे सुरक्षाबल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यातच, गुन्हा दाखल झाला, तरी यामध्ये आरोपी मयत असल्याने या प्रकरणी पुढील तपास करावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.