ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर २१ गायिकांना महिला दिनानिमित्त केला मानाचा मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:08 PM2019-03-07T16:08:46+5:302019-03-07T16:11:31+5:30
ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर २१ गायिकांना महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा करण्यात आला.
ठाणे : महिला दिनाचे औचित्य साधून अत्रे कट्ट्यावर १९३० ते आजच्या काळातील २१ गायिकांचा प्रवास उलगडण्यात आला. यावेळी त्यांची एकाहून एक सुरेल गाणी सादर करुन रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम महिलांनी सादर केला. हिंदी मराठी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिला गायिकांना कल्याणच्या हार्मनी ग्रुपच्या चार मैत्रिणींनी हा मानाचा मुजरा केला.
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी महिला दिनानिमित्त २१ गायिकांची विविध गाणी सादर करण्यात आली. सुमेधा कुलकर्णी, स्मिता चौबळ, गौरी खेडेकर, दिपाली पोतदार या चार मैत्रिणींनी आपल्या सुरेल आवाजात हिंदी - मराठी गाणी सादर करुन रसिकांचे मनोरंजन केले. प्रकाश बाबा आमटे चित्रपटातील ‘तु बुद्धी दे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली आणि ‘हे राष्ट्र देवतांचे’ या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान गौरी खेडेकर यांनी सादर केलेल्या ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, दिपाली पोतदार ‘मेरा नाम चिन चिन’, ‘लंबी जुदाई’ या गाण्यांना रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, टाळ््यांची दाद दिली. सुमेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या निवेदनातून कार्यक्रमाची माहिती दिली. या गायिकां व्यतिरिक्त अनेक गायिका आहेत ज्यांनी या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले असल्याचे सांगितले. यावेळी तबला साथ सुराज सोमण व संवादिनी साथ मंदार सोमण यांनी दिली. दरम्यान, ‘गोरी गोरी ओ बाकी छोरी’, ‘पंछी बनू उडती फिरु’, ‘तू पास रहे, तू दूर रहे’, ‘हर किसी को नही मिलता’ अशी एकाहून एक गाणी सादर करीत रसिकांच्या टाळ््या लुटल्या.