आचार्य अत्रे रंगमंदिर गणेशोत्सवानंतरच उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:20 AM2018-08-22T00:20:33+5:302018-08-22T00:21:12+5:30
महापालिका प्रशासनाने दिलेली स्वातंत्र्यदिनाची डेडलाइनही हुकली
कल्याण : देखभाल-दुरुस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेल्या शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे नाट्यगृह स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला सुरू केले जाईल, असे सांगितले जात होते, परंतु ही डेडलाइनही हुकली आहे. आता सप्टेंबरमध्ये ते सुरू होईल, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस गणेशोत्सवानंतरच रंगमंदिराचा पडदा उघडला जाईल, अशी शक्यता आहे.
केडीएमसीकडून दुरुस्तीसाठी नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती. दुरुस्ती कामांच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कामे सुरू व्हायला विलंब लागत होता. परिणामी कामांचे तीन भाग करण्यात आले आणि त्याप्रमाणे प्रत्येक कामांची स्वतंत्रपणे निविदा मागविली गेली. अखेर त्याला प्रतिसाद मिळाला.
१३ एप्रिलच्या स्थायी समितीच्या सभेत या निविदा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यावेळी सभापती राहुल दामले यांनी देखभाल दुरुस्तीच्या कामाला दिरंगाई करू नये, असे स्पष्ट केले होते. त्यावर लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल, असा दावा शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी केला होता. साधारण आॅगस्टमध्ये हे काम पूर्ण होऊन रंगमंदिर १५ आॅगस्टला सुरू केले जाईल, असा दावा प्रशासनातर्फे केला जात होता. पण ही डेडलाइनही महापालिकेला पाळता आली नाही.
दरम्यान, ९० टक्के काम झाले असून रंगरंगोटीचे बाकी आहे. सप्टेंबरमध्ये रंगमंदिर सुरू होईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके म्हणाले.
ऐन सुटीत फुले कलामंदिर राहणार बंद
अत्रे रंगमंदिराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार नाही.
जर सप्टेंबरमध्ये अत्रे रंगमंदिराचे काम पूर्ण झाले तरच ऐन आॅक्टोबर-नोव्हेंबर या सुटीच्या कालावधीत फुले कलामंदिर दुरुस्तीसाठी बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची गैरसोय होणार आहे.
गणेशोत्सवात कलाकारांची सुटी
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे. या कालावधीत कलाकार सुटी घेतात. त्यामुळे नाट्यप्रयोग बंद असतात. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच अत्रे रंगमंदिर सुरू होईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.