एसीपी निपुंगेंना उच्च न्यायालयाचा दिलासा: अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:28 PM2017-10-16T22:28:08+5:302017-10-16T22:28:10+5:30
अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ठाणे : अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे. अर्थात, या प्रकरणात त्यांची पोलीस उपायुक्तांमार्फत प्राथमिक चौकशी मात्र सुरू आहे.
तपास अधिकाºयांना संपूर्ण सहकार्य करावे, ते बोलवतील त्यावेळी चौकशीला हजर राहावे, अशा अनेक अटींवर १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा हा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी अलिकडेच फेटाळला. त्यानंतर त्यांनी ३ आॅक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी अर्ज केला होता. ६ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिने आत्महत्या केली. त्यानंतर ते भूमिगत झाले होते. भूमिगत राहूनच त्यांनी आधी ठाणे न्यायालयात त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आपला तिच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी संबंध नसून तिचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे (तिचा भावी पती) याच्याबरोबर भांडण झाले होते. तो याप्रकरणात सहआरोपी असून त्याला अटकही झाली आहे, असे काही मुद्दे निपुंगे यांच्या वकीलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच फोन कॉल्स दोन्ही बाजूंकडून झालेत का? अशा अनेक बाजू पडताळण्यात आल्या. ९ आॅक्टोबर रोजी ही बाजू ऐकल्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना तातडीने त्यावर उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यासाठी ठाणे पोलिसांनी एक दिवसाचा अवधी मागितला. मात्र, दरम्यानच्याच काळात काही अटी शर्थींवर त्यांचा हा जामीनही न्यायालयाने मंजूर केला. याची त्यांनी रितसर माहिती सोमवारी कळवा पोलिसांना हजर होऊन दिली. त्यामुळे पवार आत्महत्येच्या प्रकरणानंतर ते प्रथमच तब्बल ४० दिवसांनी तपास अधिकाºयांसमोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी आता निपुंगे यांचाही जबाब नोंदविण्याची प्रक्रीया सुरू केल्याची माहिती कळवा विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली.
दरम्यान, निपुंगे हे अद्यापही मुख्यालयात किंवा नियंत्रण कक्षात हजर झाले नसल्याची माहिती मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी ‘लोकमत’ला दिली. तर त्यांच्याविरुद्ध याच प्रकरणाची प्राथमिक चौकशी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडून सुरू आहे. यात चार जणांचे जबाब नोंदविले गेले असून हा अहवाल एक महिन्याच्या आत त्यांना पोलीस आयुक्तांकडे सादर करायचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.........................