कल्याण-कसारासह बदलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास लवकरच वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:17+5:302021-03-05T04:40:17+5:30

डोंबिवली : कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची ...

Acquisition of land for Badlapur railway line including Kalyan-Kasara will be expedited soon | कल्याण-कसारासह बदलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास लवकरच वेग

कल्याण-कसारासह बदलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास लवकरच वेग

Next

डोंबिवली : कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी दिली. मध्य रेल्वेवरील तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाचे भूसंपादन, बुलेट ट्रेनमध्ये जमीन गेलेल्या केवणी व केवणीदिवे येथील शेतकऱ्यांना दिलेला अल्प मोबदला आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेट मार्गासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी पाटील यांनी रखडलेल्या भूसंपादनाकडे लक्ष वेधले असता, नार्वेकर यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन दिले.

कळवा-ऐरोली एलिव्हेटेट मार्गाचे सिडकोने जमीन न दिल्यामुळे काम रखडले असल्याकडे लोकसभेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सिडकोने जमीन देण्याचे जाहीर केले आहे, तरी यासंदर्भात वेळेत कार्यवाही होऊन जमीन मध्य रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

भिवंडी तालुक्यातील केवणी व केवणी दिवे गावामध्ये बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित केली; मात्र तेथील जमिनीचा शासकीय दर हा ७ लाख ६३ हजार रुपये प्रती गुंठा आहे. आजूबाजूंच्या गावांमध्ये दिलेल्या बाजारमूल्यापेक्षा तो कमी आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधून या गावांचा बुलेट ट्रेनला पाठिंबा असल्याचेही नमूद केले. अखेर आजूबाजूंच्या गावांनुसार भरपाई देण्याचे आश्वासन बुलेट ट्रेनचे अधिकारी शुक्ला यांनी दिले.

या बैठकीला मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक बी. के. झा, उपमुख्य अभियंता एच. जी. कोटके, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक एस. के. चौधरी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ए. एस. थरगळे, एस. के. जैन, पी. के. श्रीवास्तव, प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर, अविनाश शिंदे, जयराज कारभारी, अभिजित भांडे-पाटील आदी उपस्थित होते.

----- ---- -- --

Web Title: Acquisition of land for Badlapur railway line including Kalyan-Kasara will be expedited soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.