अभिनय कट्टा पुन्हा पावसाच्या पुरात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:41+5:302021-07-20T04:27:41+5:30
दिव्यांग कला केंद्रावरही पावसाचे संकट लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना काळात हजारोंचा आधार ठरलेला, कलाकारांची पंढरी म्हणून ओळखला ...
दिव्यांग कला केंद्रावरही पावसाचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना काळात हजारोंचा आधार ठरलेला, कलाकारांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा अभिनय कट्टा मुसळधार पावसामुळे यंदा पुन्हा बुडून गेला. अभिनय कट्ट्याबाबत २०१७ च्या आपत्तीची पुनरावृत्ती झाली असून, येथे चालणाऱ्या दिव्यांग कला केंद्राचेही प्रचंड नुकसान झाले. वर्षानुवर्षे तीच परिस्थिती असूनही ठाणे महापालिका प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
‘नेमेची येतो पावसाळा, नेमेची होते नुकसान’ अशी परिस्थिती दरवर्षी ठाणे शहरात अनुभवास येत आहे. यात अभिनय कट्ट्याचे मात्र अतोनात हाल होत आहेत. या मुसळधार पावसात एकही वस्तू वाचू शकली नाही. कलाकारांचे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्याचप्रमाणे संगणक, फ्रीज, लॅपटॉप, मोबाइल, साधन सामग्री, पुस्तके, कलाकारांचे वेषभूषेचे कपडे यांसारख्या अनेक वस्तू, साहित्य पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा एकदा अभिनय कट्ट्यावर संकट कोसळले.
यापूर्वी २९ ऑगस्ट २०१७ रोजी अशीच परिस्थिती अभिनय कट्ट्यावर ओढवली होती. अतिवृष्टीमुळे या कलाकारांच्या पंढरीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. परंतु अशा परिस्थितीत कट्टा उभा राहिला. ‘वुई आर फॉर यु’ या संस्थेच्या माध्यमातून अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी स्वतःच्या कुटुंबापासून नऊ महिने दूर राहून हजारो कोरोना रुग्णांची सेवा केली. अडीअडचणीला धावून गेले. त्या काळात आणि आताही हाच अभिनय कट्टा कोरोना संकटात ठाणेकरांच्या मागे खंबीर उभा राहिला. आज त्याच अभिनय कट्ट्यावर पावसाचे संकट कोसळले आहे. आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्राचे काम चालते. शनिवारपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने कट्ट्याच्या झालेल्या नुकसानाबाबत कलाकार, दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक आणि समस्त ठाणेकरांनी चिंता व्यक्त केली. आता तरी ठाणे महापालिकेने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच महापालिकेने या संस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन समस्त ठाणेकरांकडून केले जात आहे.
..........
वाचली.