बेजबाबदारपणे धान्य वितरण करणाऱ्या भिवंडीतील ७४ रेशनिंग दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:01 AM2018-12-14T00:01:01+5:302018-12-14T00:04:21+5:30
भिवंडी : शासनाच्या सार्वजनिक धान्य पुरवठा पध्दतीनुसार धान्य वितरण न करता रेशनकार्ड धारकांसाठी आलेले धान्य खुल्या बाजारा प्रमाणे विक्री ...
भिवंडी: शासनाच्या सार्वजनिक धान्य पुरवठा पध्दतीनुसार धान्य वितरण न करता रेशनकार्ड धारकांसाठी आलेले धान्य खुल्या बाजारा प्रमाणे विक्री करणे, मशीनव्दारा धान्य घेतलेल्यांना पावती न देणे अशा विविध तक्रारीमुळे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरात ७४ रेशनींग दुकानावर कारवाई केली.त्यामुळे शहरात रेशनिंग दुकानदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
शहरात ११ हजार ४४९ रेशनिंग कार्डधारक आहेत.शासनाने दररोज वितरीत झालेल्या धान्याची माहिती मिळण्यासाठी आॅनलाईन प्रणाली सुरू केली असून त्यासाठी प्रत्येक रेशनिंग दुकानदारास पॉस मशीन दिली आहे.या मशीनवर रेशनकार्ड धारकाने आंगठा लावल्यानंतर त्यास धान्य दिले जाते.त्याचबरोबर रेशनकार्ड धारकास घेतलेल्या धान्याची पावती देण्याचे निर्देश शासनाने रेशनिंग दुकानदारांना दिले आहे. परंतू शहरातील अनेक दुकानदार पावती न देता धान्य वितरण करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी शहरातील ७४ रेशनिंग दुकानावर धाडी टाकून कारवाई केली.त्यापैकी दुकानादारांनी केलेल्या गैरप्रकाराने दोन दुकानदारांवर शंभरटक्के दंड आकारणी केली. तर दोन दुकानदारांवर ५० टक्के दंड आकारणी केली. असा एकुण ३२५०रूपये दंड वसुल केला. तसेच ३७ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तर ३३ दुकानदारांना पॉस मशीनव्दारा धान्य वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात प्रथमच अशी मोठी कारवाई झाल्याने रेशनिंग दुकांनदारामध्ये खळबळ माजली आहे.