मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १०४५ जणांवर कारवाईचा बडगा; १६ वर्षाखालील २६ वाहन चालकांवर कारवाई
By अजित मांडके | Published: May 29, 2024 05:36 PM2024-05-29T17:36:11+5:302024-05-29T17:36:19+5:30
ठाण्यात बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबे सरासपणे सुरु आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मद्य प्राशन करुन वाहन चालविणे हे अगदी नित्याचेच झाले आहे.
ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही वाहतूक पोलीस आता कामाला लागले आहेत. परंतु मागील चार महिन्यात वाहतुक पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १०४५ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४० लाख ८५ हजारांचा दंडही वसुल केला आहे. याशिवाय १६ वर्षाखालील २६ जणांवर कारवाई करीत १ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
ठाण्यात बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबे सरासपणे सुरु आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मद्य प्राशन करुन वाहन चालविणे हे अगदी नित्याचेच झाले आहे. परंतु आता पूण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली आहे. ठाण्यात देखील वाहतूक पोलिसांनी मागील चार महिन्यात मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, हिट अॅण्ड रणचे अपघात, १६ वर्षाखालील वाहन चालक आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही, तरी सुध्दा त्याला वाहन चालविण्यास देणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातही ठाणे पोलीस आयुक्तालयात १६ वर्षाखालील तरुण, तरुणी देखील वाहने चालवित असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर प्रकर्शाने समोर आली आहे. त्यामुळे या बाबतीत पालकही त्याला तितकेच जबाबदार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. १६ वर्षाखालील २६ वाहन चालविणाºयांवर कारवाई करीत १ लाख ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, वाहन मालक वेगळा आणि त्याचे वाहन चालविणाऱ्याकडे लायसेन्स नसल्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल २९५ जणांवर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कारवाई करुन १४ लाख ६५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय मद्य पिउन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून चार महिन्यात १०४५ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ४० लाख ८५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याच चार महिन्यांच्या कालावधीत हिट अॅण्ड रनच्या देखील केसस दाखल झाल्या असून ज्यात ३४ अपघात झाले असून त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी आणि तपासणी सुरु असतानाही मद्यप्राशन करून दुचाकी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून फिरणाऱ्या दुचाकी, कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी आदी वाहन चालक हे नाकाबंदीला हुलकावणी देत शहरभर फिरताना आढळतात. हाच प्रकार महामार्गावर देखील असल्याने अपघातात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ या वर्षात ४८२ अपघात झाले. तर त्यात २०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.