मराठीत नामफलक नसलेल्या १५३ दुकानांवर फौजदारी कारवाई; साडेतीन लाखांचा दंड
By सुरेश लोखंडे | Published: November 1, 2022 05:58 PM2022-11-01T17:58:19+5:302022-11-01T17:59:16+5:30
फौजदारी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले
ठाणे : जिल्ह्यातील दुकाने व व्यापारी आस्थापनांवरील फलक मराठी, देवनागरी लिपित प्रदर्शित न करणाºया १५३ दुकाने,व्यापारी आस्थापनाच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा येथील कामगार उप आयुक्त कार्यालयाने उगारला आहे. याशिवाय १५ दुकानाच्या मालकांवर सुमारे साडेतीन लाख रूपये दंड आकारण्यात आला आहे.
फौजदारी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले आहे. शासनाने घोषीत केल्याप्रमाणे मराठीतून नामफलक लावले की नाही, याची अलिकडेच जिल्ह्यामध्ये तपासणी मोहीम राबवण्यातआली. या मोहिमेव्दारे ४५७ दुकाने व व्यापारी आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यातील ३०४ दुकानांची,आस्थापनांची नावे मराठीमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, मराठी नामफलक प्रदर्शित न केलेल्या १५३ दुकाने,व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. तर १५ आस्थापना मालकांनी कामगार उप आयुक्तांकडे गुन्हा मान्य केल्याचे आढळून आल. या त्रुटींच्या पुर्ततेसह १५ आस्थापनांच्या मालकांना तीन लाख ४९ हजार ५०० रु. इतका दंड आकारणी करण्यात आला आहे. यापैकी एका आस्थापनेच्या मालकाला दोन लाख ८६ हजार प्रशमन शुल्क व दंड आकारण्यात आल्याची माहिती भोसले यांनी दिली.