बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट
By अजित मांडके | Published: October 19, 2022 10:36 PM2022-10-19T22:36:31+5:302022-10-19T22:36:44+5:30
खाडीमधून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
ठाणे :
खाडीमधून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी ठाण्यातील मुंब्रा - दिवा तसेच डोंबिवली व कोपर या खाडी ठिकाणी सात बोटींसह आठ सेक्शन पंप नष्ट करण्यात आला आहे. तर अंदाजे किंमत दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांनी बैठक घेत, बेकायदेशीररित्या खाडीतून रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ठाणे निवासी नायब तहसीलदार, ठाणे, मुंब्रा, बेलापूर, बाळकुम मंडळ अधिकारी तसेच सर्व तलाठी यांना दिले. त्यानुसार पथकांची स्थापना करून बुधवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या धडक कारवाईत मुंब्रा - दिवा तसेच डोंबिवली व कोपर या खाडी ठिकाणी ५ बोटी व ७ सेक्शन पंप - खाडीमध्ये पाणी कमी असल्यामुळे पाण्यातून काढता येत नसल्याने पाण्यात बुडवून व आग लाऊन नष्ट करण्यात आले. तसेच २ बोटी व १ सेक्शन पंप मुंब्रा येथील गणेश घाट येथे आणून गॅस कट्टरच्या सहाय्याने कापण्यात आले.अशा प्रकारे एकूण अंदाजे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.अशी माहिती ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी दिली.