अल्पवयीन रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:28 AM2019-12-28T01:28:11+5:302019-12-28T01:28:16+5:30
डोंबिवलीत बडगा : वाहतूक पोलिसांनी रिक्षांना लावले जॅमर
डोंबिवली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत पाच अल्पवयीन रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस शाखेत नेण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. दिवसभरात रिक्षाचालकांकडून आठ हजार २०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
रिक्षाचालकांची मनमानी, अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी, भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन आदी समस्यांवर ‘लोकमत’ने सोमवारी ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत डोंबिवली वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एन. जाधव व त्यांच्या पथकाने शुक्रवारी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकापासून कारवाई सुरू केली.
यावेळी रस्त्यामध्ये रिक्षा उभ्या करणाºया रिक्षाचालकांच्या रिक्षांना जॅमर लावण्यात आले. त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. डोंबिवलीत रिक्षा चालविणाºया पाच अल्पवयीन मुलांवर कारवाई करताना त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, लायसन्स नसणे, गणवेश परिधान न करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे अशा रिक्षाचालकांवरही बडगा उगारण्यात आला.
दरम्यान, डोंबिवलीत वाहतुकीचे नियम मोडणाºया रिक्षाचालकांची संख्या जास्त आहे. रिक्षाचालकांनी शिस्त आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास शहरातील वाहतूककोंडीची समस्या काही अंशी सुटेल, असे जाधव यांनी सांगितले.