महापालिकेची प्लास्टिकबंदीच्या विरोधात पुन्हा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:24 AM2018-10-05T05:24:26+5:302018-10-05T05:24:29+5:30
3.44 लाखांचा दंड केला वसूल, 13 टन प्लास्टिक जप्त, 1235 दुकानांवर झाली कारवाई
ठाणे : मागील काही दिवसांपासून थांबलेली प्लास्टिकबंदीची कारवाई ठाणे महापालिकेमार्फत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १३.७७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ३.५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली. कारवाई करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत.
या कारवाईअंतर्गत मानपाडा प्रभाग समितीमधून एकूण ३०००० रु पये दंड व ८३ किलो प्लास्टिक, तर नौपाडा प्रभाग समितीत एकूण ३५००० रु पये दंड व १२० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकूण ८० कर्मचारी कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बिसलेरी इंटरनॅशनल प्रा.लि. ही संस्था पालिका क्षेत्रात महापालिकेच्या मान्यतेने बिसलेरी बॉटल फॉर चेंज प्रोग्राम हा उपक्र म राबवत आहे. यामध्ये या संस्थेने पाच ठिकाणी प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचे संकलन केंद्र उभारले असून स्वत:चे वाहन वापरून ते बाटल्या संकलन करत आहेत. संकलित बाटल्या मान्यताप्राप्त पुनर्चक्रीकरण केंद्रात पाठवल्या जातात.
या बिन्स मासुंदा तलाव, उपवन तलाव, टीएमटी बसस्थानक, सॅटीस, डी. मार्ट, घोडबंदर रोड व बेडेकर महाविद्यालय ठाणे येथे उभारण्यात आल्या आहेत. ही संस्था स्त्रीमुक्ती कचरावेचक संस्थेच्या समन्वयाने काम करत असून आॅगस्ट २०१८ मध्ये एकूण १४८७ किलो प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. दरम्यान, प्लास्टिकबंदीप्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने महापालिकेने सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये शासननिर्णयाद्वारे, बंदी असलेल्या व वापरण्यास मान्यता असलेल्या प्लास्टिक, थर्माकोल वस्तूंचे जनजागृतीपर फलक उभारले आहेत.