कुख्यात गँगस्टर पुजारी टोळीच्या हस्तकांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:15 AM2018-07-04T00:15:25+5:302018-07-04T00:15:39+5:30
कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीची दहशत पसरविण्यासाठी भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टवर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीची दहशत पसरविण्यासाठी भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टवर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी या प्रकरणातील चारही आरोपींचा पुन्हा ताबा घेतला.
मुंबई पोलिसांनी १९ जानेवारी रोजी कल्याणमधील चिंचपाडा येथील हरिश कृष्णाप्पा कोटीयन उर्फ कुमार, रत्नागिरी येथील अनिकेत किशोर ठाकूर उर्फ अन्नू, डोंबिवली येथील संकेत उदय दळवी उर्फ सॅण्डी आणि प्रथमेश शिवराम कदम उर्फ भाया यांना एका गुन्ह्यामध्ये अटक केली होती. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने १५ फेब्रुवारी रोजी त्यांना स्वत:च्या ताब्यात घेतले. आरोपींची कार्यपद्धती संघटित गुन्हेगारीप्रमाणेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्यान्वये कारवाई प्रस्तावित होती. अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई करून आरोपींचा ताबा खंडणीविरोधी पथकाने घेतला. मंगळवारी त्यांना ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले गेले.
सुरेश पुजारीच्या अनेक टोळ्या पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सक्रिय आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना पुजारीने ५० लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची उकल खंडणीविरोधी पथकाने आरोपींच्या चौकशीतून केली होती. आता आरोपींची नव्याने पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांचे वेगवेगळ्या शहरांमधील साथीदार, त्यांची कार्यपद्धती आणि इतर मुद्यांवर चौकशी केली जाणार आहे.