बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:45+5:302021-09-23T04:46:45+5:30
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा. त्याचबरोबर नवीन बेकायदा ...
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा. त्याचबरोबर नवीन बेकायदा बांधकामे निर्माण होऊ देऊ नका. फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवा, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी अतिक्रमण विभागाच्या बैठकीमध्ये दिले. बेकायदा बांधकाम आणि फेरीवाल्यांना अभय दिल्याचे आढळले तर संबंधित सहायक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोना काळात शहरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमुळे टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अशा बांधकामांवर कारवाई सुरू केली. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाब झुगारून सातत्याने कारवाई सुरू आहे. शहरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला करणारा फेरीवाला असला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठीच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा पिंपळे यांनी केला होता. महापालिका सर्वसाधारण सभेत यावर चर्चा झाली होती. त्यावेळी फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. शहरातील अशा कारवाईचा आढावा घेण्यासाठी हेरवाडे यांनी बुधवारी पालिकेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व सहायक आयुक्त, बीट निरीक्षक आणि अभियंते उपस्थित होते.
............