फेरीवाल्यांविरोधात खडकपाड्यात कारवाई; मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:59 PM2019-06-07T23:59:11+5:302019-06-07T23:59:28+5:30
पदपथावरही अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही जिकिरीचे झाले होते. त्यात गुरुवारी फेरीवाल्यांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केली.
कल्याण : केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाने शुक्रवारी खडकपाडा परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. फेरीवाल्यांच्या मुजोरीविरोधात मनसेने इशारा दिल्यानंतर महापालिकेने हे पाऊल उचलले. फेरीवाल्यांच्या हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांचे सामानही जप्त करण्यात आले.
खडकपाडा ते गोदरेज हिल परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले होते. पदपथावरही अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही जिकिरीचे झाले होते. त्यात गुरुवारी फेरीवाल्यांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही बाब मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांना सांगण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात तक्रार देण्यात आली. तसेच खडकपाडा परिसरात अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाइलने कारवाई करू, असा इशारा ‘ब’ प्रभागक्षेत्र फेरीवालाविरोधी पथकाला भोईर आणि मनसे कार्यकर्त्यांनी दिला होता.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी अतिक्रमणविरोधी पथकाने खडकपाडा येथे फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांच्या हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली, तर पदपथावरील स्टॉलची नासधूस करण्यात आली. त्याचबरोबर सामानही जप्त करण्यात आले. या कारवाईच्या वेळी भोईर हे देखील आवर्जून उपस्थित होते.