घोडबंदर येथील वाळू माफियांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:50+5:302021-07-14T04:44:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - घोडबंदरच्या रेतीबंदर येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाई केली. ४ सक्शन पंप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - घोडबंदरच्या रेतीबंदर येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाई केली. ४ सक्शन पंप जप्त करून ५४ ब्रास रेतीसाठा खाडीत टाकून दिला, तर विनास्वामित्वधन गौणखनिज वाहतूक करणाऱ्या २ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
मंडल अधिकारी प्रशांत कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अभिजित बोडके, नितीन पिंगळे आदींनी सोमवारी घोडबंदरच्या रेतीबंदर येथे खाडीकिनारी धाड टाकली. वाळू चोरणारे रवी सॅण्ड, मायकल शेठ, विनोद उपाध्याय व रमन्ना शेट्टी यांच्या असलेल्या सुमारे ५४ ब्रास वाळूसाठ्यावर कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने वाळू खाडीपात्रात ढकलून दिली. तसेच चार सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्यावतीने देण्यात आली.
याशिवाय मुंबई - अहमदाबाद महामार्गावर दिल्ली दरबार हॉटेलजवळ विनापरवाना रॉयल्टी नसलेल्या रेती व खडीच्या २ गाड्या महसूल विभागाने जप्त केल्या आहेत. राजू काळे याची रेतीची गाडी बनावट वाहतूक परवाना बनवून संपलेल्या रॉयल्टीवर चालवली जात होती, तर मालक इम्रान कुरेशी व चालक हरिशंकर यादव हे विनापरवाना खडी घेऊन चालले होते. या दोन्ही वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे सुद्धा पत्र देण्यात येणार आहे.