फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई, उल्हासनगरात व्यापारी व पालिका कर्मचारी आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 03:43 PM2020-11-07T15:43:17+5:302020-11-07T15:43:49+5:30
Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण कारवाई वेळी व्यापारी व महापालिका कर्मचारी आमने सामने आले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण कारवाई वेळी व्यापारी व महापालिका कर्मचारी आमने सामने आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून मुजोर व्यापाऱ्यांनी डुंपर मध्ये टाकलेले साहित्य काढून टाकले आहे.
उल्हासनगरातील मोबाईल, फर्निचर, जपानी व गजानन कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मध्ये नागरिकांनी दिवाळी सणा निमित्त खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. नेहरू चौक, शिरू चौक, शिवाजी चौक परिसरातील रस्ता फुटपाथवर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यावर अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वा खालील पथकाने शुक्रवारी कारवाई केली. दरम्यान मनसेचे सचिन बेंडके यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने फेरीवाल्याची व्यथा उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे मांडून साहित्य विक्री करण्याला परवानगी मागितली. अतिक्रमण पथकाने त्यानंतर आपला मोर्चा शेजारील १७ सेक्शन येथील मोबाईल मार्केटकडे वळविला. रस्त्याच्या फुटपाथवर साहित्य ठेवणाऱ्या साहित्य जप्त करण्याची कारवाई केली.
रस्त्याच्या फुटपाथवर ठेवलेले साहित्य अतिक्रमण पथकाने जप्त करून ट्रक मध्ये टाकले. सामान व इतर साहित्य उचललेच्या निषेधार्थ व्यापारी व महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी, कर्मचारी आमने सामने आल्याने प्रचंड गोंधळ व तणाव निर्माण झाला. मुजोर व्यापाऱ्यांनी महापालिका अतिक्रमण पथकाने जप्त करून ट्रक मध्ये टाकलेले सामान काढून टाकले. या प्रकाराने हादरलेल्या महापालिका कर्मचारी व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. ऐन दिवाळीत महापालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद नको म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केली. अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी ५ पेक्षा जास्त व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केला.
व्यापाऱ्यांना शिस्त लागण्याची गरज - गणेश शिंपी
ऐन दिवाळीत नागरिक व व्यापाऱ्याच्या सुरक्षेसाठी शहरात वाहतूक कोंडी होऊन अपघात होऊ नये, म्हणून महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक फुटपाथ वरील अतिक्रमण हटवीत आहेत. व्यापाऱ्यांनी कारवाईला सहकार्य करायला हवे. अशी अपेक्षा असताना विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाणे, कितपत योग्य आहे. असा प्रश्न सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी केला आहे. तसेच महापालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहे.