रुग्णालय मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई: दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:37 AM2023-08-14T08:37:21+5:302023-08-14T08:37:38+5:30
मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु रुग्णालयातील मृत्यूचा रेशो हा ४.५ टक्के एवढा आहे. असे असतानाही जे १८ मृत्यू झालेले आहेत, ते मृत्यूच्या रेशोपेक्षा अधिक असल्याने चौकशीसाठी उच्च समिती नेमण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली.
केसरकर पुढे म्हणाले की, मृत्यू नैसर्गिक झाले असतील, तर त्यांना मदत देता येणार नाही. परंतु यंत्रणेच्या चुकीमुळे मृत्यू झाले असतील, तर त्यांना मदत देता येणे शक्य आहे. चौकशीत यंत्रणांची चूक निदर्शनास आल्यास दोषी असणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रुग्णालयात ५०० बेडची क्षमता असताना या ठिकाणी सद्य:स्थितीत ५६६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण वाढला, परंतु तिकडे सिव्हिल रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचेही केसरकरांनी सांगितले. रुग्णांची परवड होणार नाही, यादृष्टीने ट्रस्टच्या रुग्णालयांतील बेडची माहिती यापुढे रुग्णांना दिली जाणार असून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनाही सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मृत्यूला सरकारच जबाबदार - खा. विचारे
कोविड काळात कसलीच कमतरता नव्हती, मात्र आता लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे, अशी टीका ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे. या १८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असल्याचेही ते म्हणाले.
जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकर
शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती व इतर सामग्रीसाठी पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.