ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठाण्यातील तीन हॉटेलवर कारवाई!
By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2023 09:25 PM2023-10-18T21:25:35+5:302023-10-18T21:44:23+5:30
या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे: स्वयंपाकगृहातील अस्वच्छतेसह अन्न पर्दाांची हाताळणी करणारे कामगार संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असलेल्याचा तपासणी अहवाल नसणे, पिण्यायोग्य पाणी न ठेवणे, पार्सल आणि विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यासह अनेक त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या ठाण्यातील गजानन वडापाव, बिर्याणी कबाब करी आणि भिवंडीच्या गोरसईतील दिल्ली दरबार ढाबा या तीन हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सील बंद करण्याची कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे यांच्या पथकाने ठाण्यातील वंदना सिनेमागृहाजवळील ओम साईराम फूडस यांच्या बिर्याणी कबाब करी या हॉटेलवर १८ ऑक्टोबर रोजी अचानक धाड टाकली. या धाडीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. याठिकाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, अन्न पदार्थांची विक्री करतांना, कच्च्या पदार्थांची हाताळणी करणाऱ्या कामगारांचे संसर्गजन्य, त्वचारोग किंवा तशाच आजारांपासून मुक्त असल्याचा वैद्यकीय दाखला नसणे, अन्न पदार्थांची खरेदी विक्री बिले नसणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशा ३१ त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत.
असाच प्रकार सदानंद भालेकर यांच्या ‘राजमाता वडापाव’ या राममारुती रोडवरील उपहारगृहातही आढळला. याठिकाणी वडाभाव बनविण्यासाठी तयार केलेली चटणी, कांदा भजी आदी साहित्य उघड्या भांडयात ठेवल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला नसणे, स्वयंपाकगृहातील अस्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल केल्याचे बिल नसणे अशा २७ त्रुटी याठिकाणीही आढळल्या. त्यामुळे हे दोन्ही हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले.
भिवंडीतील दिल्ली दरबारमध्येही अनियमितता
भिवंडीतील ‘दिल्ली दरबार’ या ढाब्यावरही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. योग्य शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीकडे पर्यवेक्षक पदी नेमणूक नसणे, पाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, कामगारांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, स्वच्छतेचा नियमांना हारताळ फासणे आणि पेस्ट कंट्रोल केल्याचा अहवाल नसणे अशा त्रुटी याठिकाणच्या तपासणीत आढळल्या. त्यामुळे हा ढाबा बंद करण्याची नोटीस अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. वीरकायदे यांनी बजावली आहे. या तिन्ही हॉटेलांवरील कारवाईने अन्न पदार्थांची नियमांना हारताळ फासून विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि उपहारगृह चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.