बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई, भिवंडीत दोन महिलांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:29 AM2018-04-05T05:29:10+5:302018-04-05T05:29:10+5:30
बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे - बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चार बांगलादेशी घुसखोर महिलांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ मार्च रोजी कारवाई करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणि
महिला कर्मचाºयांच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकून रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना अटक केली होती.
नजमा कबीर शेख हिने आठ वर्षांपूर्वी, तर उर्वरित तीन महिलांनी साधारणत: सहा ते आठ महिन्यांपूर्वी घुसखोरी केली. चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्यासाठी संगीता शेठाणी आणि सामसू शेठाणी यांनी या चारही महिलांना बेकायदेशीररीत्या आश्रय दिला होता. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आश्रयदात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी महिला फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रवींद्र दौंडकर यांनी दिली.
घरमालकांत खळबळ
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे घुसखोरांना बेकायदेशीररीत्या थारा देणाºया घरमालकांमध्ये खळबळ उडाली आहे. बांगलादेशातून घुसखोरी केलेले नागरिक मुख्यत्वे भिवंडी आणि मुंब्रा परिसरात वास्तव्य करतात. या घुसखोरांसोबतच त्यांना आश्रय देणाºयांविरुद्धही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
परदेशी नागरिकास भाडेकरू म्हणून ठेवताना जवळच्या पोलीस ठाण्यास तशी सूचना तातडीने द्यावी लागते. तसा नियमच अस्तित्वात आहे. घरमालकांनी कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवताना या नियमाचे महत्त्व समजून घ्यावे. अन्यथा, त्यांनाही अशा प्रकारच्या फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल.
- रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, ठाणे