भाईंदरमधील वादग्रस्त जाहिरात फलकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:38 AM2021-08-29T04:38:40+5:302021-08-29T04:38:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड - बेकायदा जाहिरात फलक, होर्डिंग व कमानींविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सातत्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - बेकायदा जाहिरात फलक, होर्डिंग व कमानींविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सातत्याने मुंबई उच्च न्यायालय देत असतानाच भाईंदर येथील 'अगला आमदार उत्तरभारतीय होगा' असा मजकूर लिहिलेल्या एका वादग्रस्त जाहिरात फलकावरून मराठी एकीकरण समिती व मनसे आक्रमक झाली. त्या अनुषंगाने पोलीस व पालिकेने बेकायदा जाहिरात फलक काढून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील मुख्य रस्त्यावर वीजवाहक टॉवरखाली ‘मीरा भाईंदर का अगला आमदार कोई उत्तर भारतीय ही होगा’ अशा आशयाचा जाहिरात फलक अनधिकृतपणे लावण्यात आला होता. असा वादग्रस्त फलक लावल्याचे कळताच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख व सहकारी तर मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत व मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी नवघर पोलीस व पालिकेकडे केली. त्यानंतर तो फलक पोलिसांनी काढायला लावला.
स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसांना डिवचण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान दुखावून शहरातील शांतता भंग होऊन लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा या हेतूने फलक लावण्यात आला असावा. अशांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे व मराठी एकीकरण समितीने केली आहे.