गावठी दारुच्या अड्डयावर कारवाई
By admin | Published: May 6, 2016 02:27 AM2016-05-06T02:27:16+5:302016-05-06T02:27:16+5:30
गावठी दारुच्या विरोधात ठाणे पोलिसांनी उघडलेल्या एका मोहिमेंतर्गत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ठाणेच्या पथकाने भिवंडी कोनगाव भागातून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी
ठाणे : गावठी दारुच्या विरोधात ठाणे पोलिसांनी उघडलेल्या एका मोहिमेंतर्गत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ठाणेच्या पथकाने भिवंडी कोनगाव भागातून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच काळ्या गुळासह ४६ लाख ८४ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
कोनगाव येथील आर.जे. कंपाउंडमधील दीपक खेमाणी यांनी अवैध गावठी दारुच्या निर्मितीसाठी खाण्यास अयोग्य असलेल्या काळा गुळाची आणि पिवळसर भुकटीसारखी साखरेची विक्री करण्यासाठी साठा केल्याची माहिती मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने भिवंडीतील या गोदामात ४ मे रोजी छापा टाकला. चार गोदामातून १३७ टन काळा गुळ आणि ४५ टन पिवळसर साखरेची भुकटी असा एकूण १८२ टन साठा हस्तगत केला. सुमारे ४७ लाखांचा माल जप्त करुन हे चारही गोदाम सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे गोदाम कल्याण येथील दीपक खेमाणी यांनी व्यवसायासाठी भाड्याने घेतले आहे.
हा माल कोणत्या हातभट्टीसाठी तयार करण्यात येणार होता़?, तो कोणी आणला? याबाबतचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोदामातील काळा गुळ आणि भुकटीचे नमुने घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यावर त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)