समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या गटई स्टॉल्सवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:40 PM2021-09-24T12:40:33+5:302021-09-24T12:47:22+5:30
चर्मकारांनी ठामपासमोर केले धरणे आंदोलन
ठाणे: सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे महानगर पालिकेने चप्पल शिवणार्यांच्या गटई स्टॉल्सवरही कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्यात समाजकल्याण खात्याने सुमारे 265 जणांना स्टॉल्स प्रमाणित केले असतानाही ही कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ संत रवीदास गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. समाजकल्याण खात्याने ठाण्यातील 265 गटई स्टॉल्सला प्रमाणित केले असून त्या संदर्भात ठाणे महानगर पालिकेला जिल्हाधिकार्यांनी अवगत केले आहे. तरीही 2015 मध्ये या गटई स्टॉल्सवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने गटई कामगारांनी त्यावेळी उपोषणाचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी गटई कामगार आणि ठामपा अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये समाजकल्याण प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. तरीही, स्टॉल्सवर कारवाई केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सुमारे 200 ते 250 चर्मकार बांधव सहभागी झाले होते. रोजगार आामच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा; परत करा, परत करा.. आमचे स्टॉल्स परत करा, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
दरम्यान, ठाणे शहरात समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवरील कारवाई रद्द करण्यात यावी; समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेले स्टॉल्स ठामपाने जप्त केले आहेत. ते तत्काळ परत करण्यात यावेत; गटई स्टॉल्सचा समावेश फेरीवाल्यांमध्ये करु नये/बैठा व्यवसाय करणार्या चर्मकारांना पिच (बैठा) परवाना द्यावा; समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सला ठामपाने करआकारणी करावी; समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सची कागदपत्रे तपासून त्यांनाही ठामपाकडून मंजूरी द्यावी, अशा मागण्या राजाभाऊ चव्हाण यांनी केल्या.