शाळांनी फीची सक्ती केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:27+5:302021-06-24T04:27:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात फीची सक्ती करून मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळेवर कारवाईची टांगती तलवार उभी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाकाळात फीची सक्ती करून मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळेवर कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे. प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून शाळांना खुलासा करण्यास सांगितले आहे.
उल्हासनगरमधील काही शाळा मुलांना फी भरायला सांगत आहेत. तसेच फी न दिल्यास ऑनलाइन वर्गाला बसण्यास मनाई करीत असल्याचे प्रकार उघड झाले आहे. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी एका शाळेसमोर धरणे आंदोलन करून शिक्षण मंडळाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. तसेच अशा शाळेवर कारवाईची मागणी केली. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी.एन. मोहिते यांनी २२ जून रोजी शहरातील सर्व शाळांना एक पत्र पाठवून फीबाबत खुलासा करण्याच्या सूचना केल्या. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून बहुतांश जणांच्या वेतनात मोठी कपात झाली. तर, व्यापारी व व्यावसायिक यांचे व्यवसाय बंद असल्याने सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मुले व पालकांना फीबाबत सक्ती करून ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे पत्रात सुचविले.
शाळांनी फीबाबत खुलासा केला नाहीतर कारवाईचा इशारा मोहिते यांनी दिला आहे. प्रशासन अधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही शाळांनी शुल्काबाबत सक्ती केल्यास त्यांच्या विरोधात मनसे स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांनी दिला आहे.