उल्हासनगरात शाळांनी शुल्काची सक्ती केल्यास कारवाई; महापालिकेचा सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 PM2021-06-23T16:13:20+5:302021-06-23T16:13:41+5:30
शहरातील शाळांनी शालेय शुल्का बाबत खुलासा केला नाहीतर, कारवाईचा इशारा प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना काळात शुल्काची सक्ती करून मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित करणाऱ्या शाळेवर कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली. महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून शाळांना खुलासा सादर करण्याचे सांगितले.
उल्हासनगरातील काही शाळा मुलांना व्हाट्सअप, मेसेज व फोन करून शाळेच्या फी भरण्याचे सांगत आहेत. तसेच फी अदा न केल्यास ऑनलाईन वर्गाला बसण्यास मनाई करीत असल्याचे प्रकार उघड झाले. याबाबत मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी एका शाळे समोर धरणे आंदोलन करून शिक्षण मंडळाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. तसेच अशा शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी २२ जून रोजी शहरातील सर्व शाळेना एक पत्र पाठवून शाळा फी बाबत खुलासा करण्याचे सुचविले. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून बहुतांश जणांच्या वेतनात मोठी कपात झाली. तर व्यापारी व व्यावसायिक यांचे धंदे व व्यापार बंद असल्याने सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अश्या वेळी मुलांना व पालकांना शाळा शुल्काची शक्ती करून ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित ठेवू नये. असे पत्रात सुचविले.
शहरातील शाळांनी शालेय शुल्का बाबत खुलासा केला नाहीतर, कारवाईचा इशारा प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिला. प्रशासन अधिकाऱ्याच्या पत्राने हजारो विध्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला असून शाळा प्रशासनाला वचक बसला आहे. प्रशासन अधिकाऱ्याच्या पत्रानंतरही शाळांनी शुल्का बाबत सक्ती केल्यास, त्यांच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांनी दिला.